दि. २२-०७-२०२६ रोजी कोराडी प्रशिक्षण केंद्रास माननीय राधाकृष्णन बी, अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक (CMD) (भा.प्र.से.), माननीय श्री. अभय हरणे, संचालक (संचालन), श्री. धनाजी तोरस्कर, कार्यकारी संचालक (मानव संसाधन) तसेच श्री. राजेश पाटील, कार्यकारी संचालक (संवसु -२) यांनी सदिच्छा भेट देऊन प्रशिक्षणार्थींशी संवाद साधला.
यावेळी इंडक्शन प्रशिक्षणातील अभियंते व कनिष्ठ रसायनशास्त्रज्ञे तसेच फॅमिलिअरायझेशन प्रशिक्षणातील नव्याने नियुक्त कनिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला.
माननीय श्री. अभय हरणे, संचालक (संचालन) यांनी प्रशिक्षणार्थींना उत्कृष्ट कार्यप्रदर्शन, सातत्यपूर्ण कौशल्यवृद्धी आणि महानिर्मितीच्या प्रगतीत सक्रिय योगदान देण्याचे आवाहन केले. तसेच महानिर्मितीच्या भावी विस्तार आराखड्याची माहिती देताना सध्याची १४.५ GW स्थापित क्षमता २०३० पर्यंत २२ GW आणि २०३५ पर्यंत ३२ GW करण्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगून या वाटचालीत योगदान देण्यासाठी स्वतःला सक्षम बनविण्याचे आवाहन केले.
माननीय CMD साहेबांनी प्रशिक्षणार्थींना समर्पणभावनेने कार्य करण्याचे, सातत्याने ज्ञान व कौशल्य वृद्धिंगत करण्याचे, सकारात्मक दृष्टीकोन जोपासण्याचे आणि जबाबदारीने कर्तव्य बजावण्याचे आवाहन केले. चांगले संस्कार, शिस्त आणि प्रामाणिकपणाच्या बळावर “Make the Company Better than Yesterday” हा दृष्टिकोन स्वीकारून अधिक कार्यक्षमता आणि विश्वासार्हता जपत महानिर्मितीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी योगदान द्यावे, तसेच आपल्या उत्कृष्ट कार्यातून महानिर्मितीची प्रतिष्ठा अधिक उंचावून गौरव मिळवावा, असे प्रेरणादायी मार्गदर्शन त्यांनी केले.
श्री राजेश मोराळे, मुख्य अभियंता (प्रशिक्षण) यांनी मान्यवरांचे मनःपूर्वक आभार मानून त्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे प्रशिक्षणार्थ्यांना उत्कृष्ट कार्यासाठी निश्चितच प्रेरणा मिळेल असा विश्वास व्यक्त केला.
याप्रसंगी श्री. विवेक रोकडे, मुख्य अभियंता (खापरखेडा औ. वि. कें), श्री. विलास मोटघरे, मुख्य अभियंता (कोरडी प्रकल्प), श्री. राहुल नाळे, मुख्य अभियंता (तांत्रिक), श्री. मुकेश मेश्राम, उपऔ.सं.अ. तसेच कोराडी प्रशिक्षण केंद्र येथील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.