कोराडी प्रशिक्षण केंद्रातर्फे आयोजित आरोग्य व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद


कोराडी प्रशिक्षण केंद्रातर्फे महानिर्मितीच्या अधिकारी, कर्मचारी तसेच त्यांच्या कुटुंबीयांसाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘आरोग्य व्यवस्थापन’ प्रशिक्षण कार्यक्रमाला आज उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कोराडी, खापरखेडा, पारस, परळी, चंद्रपूर, भुसावळ आणि नाशिक येथील कर्मचारी व कुटुंबीयांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाचा मनापासून लाभ घेतला. एकूण ८७ प्रशिक्षणार्थींनी कार्यक्रमात सहभागी होऊन आरोग्यविषयक माहिती आत्मसात केली.

कार्यक्रमाची सुरुवात श्री. शाम राठोड, मुख्य अभियंता (RE व प्रशिक्षण) तसेच सौ. भारती विजयकर, अधीक्षक अभियंता यांच्या हस्ते पारंपरिक दीपप्रज्वलनाने झाली. या प्रसंगी श्री. राठोड,मुख्य अभियंता यांनी शारीरिक व मानसिक आरोग्याचा समतोल राखण्याचे महत्त्व आणि त्यासाठी आवश्यक असणाऱ्या दैनंदिन सवयींबाबत मार्गदर्शन केले.

प्रशिक्षणात दोनसत्रांचे आयोजन करण्यात आले होते.
पहिल्या सत्रात डॉ. संजय तांबे (MD, होमिओपॅथ) यांनी हृदय स्वास्थ्य व प्रतिबंधात्मक उपाययोजना या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. बदलत्या जीवनशैलीत हृदयविकारांपासून संरक्षणासाठी कोणत्या सवयी अंगीकाराव्यात याबाबत त्यांनी उपयुक्त माहिती दिली.

दुसऱ्या सत्रात डॉ. सोनाली आगाशे, आयुर्वेदिक सल्लागार, यांनी दैनंदिन जीवनातील आयुर्वेदिक आरोग्य पद्धती, प्रतिकारशक्ती वृद्धी व संतुलित जीवनशैली याबाबत मार्गदर्शन केले. सहभागी कर्मचारी व कुटुंबीयांनी दोन्ही सत्रांतील माहिती अत्यंत उत्साहाने ग्रहण केली.

कामकाजातील वाढता ताण व बदलती जीवनशैली लक्षात घेता अशा प्रकारचे आरोग्य व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम कर्मचारी वर्गासाठी अत्यंत उपयुक्त ठरत असल्याचे मनोगत उपस्थितांनी व्यक्त केले.

या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सौ. ऋतुजा घोंगडे, कार्यकारी अभियंता, यांनी कोर्स डायरेक्टर व कोऑर्डिनेटर म्हणून भूमिका बजावली. कोरडी प्रशिक्षण केंद्राच्या संपूर्ण टीमने प्रभावी नियोजन करून कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडला.