कोराडी प्रशिक्षण केंद्र येथे दिनांक १२-डिसेंबर-२०२५ रोजी, महानिर्मितीच्या औष्णिक विद्युत केंद्रातील मुख्य अभियंते, उपमुख्य अभियंते यांच्यासाठी “MYT Regulations and Tariff Recovery Mechanism” या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. वीज निर्मिती क्षेत्रातील नियामक चौकट, दरनिर्धारण प्रक्रिया तसेच महसूल पुनर्प्राप्ती यंत्रणेची सखोल माहिती देणे हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता.
या कार्यशाळेस महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक मा. श्री. राधाकृष्णन बी., मा. श्री संजय मारुडकर (संचालक – संचलन), मा. श्री अभय हरणे (संचालक – प्रकल्प/इंधन), तसेच मा. कार्यकारी संचालक श्री. पंकज सपाटे (सं. व सु.–१) आणि श्री. राजेश पाटील (सं. व सु.–२) प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यशाळेत मार्गदर्शन करताना मा. श्री. राधाकृष्णन बी. यांनी भविष्यातील आव्हानांना यशस्वीपणे सामोरे जाण्यासाठी तांत्रिक कौशल्यांसोबतच व्यवस्थापकीय कौशल्ये आत्मसात करण्याची गरज अधोरेखित केली. प्रत्येक वीज केंद्रातून MOD Framework अंतर्गत सातत्यपूर्ण वीज निर्मिती साध्य करण्यासाठी कार्यक्षमता वाढ, व्यावसायिक दृष्टिकोन आणि सर्व वीज केंद्रांसाठी सामायिक रचनाबद्ध सूत्रीकरणासह System Based Approach अवलंबण्यावर त्यांनी भर दिला.
कार्यशाळेत पुढे बोलताना मा. श्री. राधाकृष्णन बी. यांनी महानिर्मितीच्या सातत्यपूर्ण प्रगतीसाठी प्रत्येक स्तरावरील अधिकारी व कर्मचारी संवेदनशील असणे अत्यंत आवश्यक असल्याचे नमूद केले. धोरणात्मक निर्णय, नियामक बाबी, खर्च नियंत्रण, कार्यक्षमता आणि महसूल पुनर्प्राप्ती या सर्व घटकांची समज सर्वांपर्यंत पोहोचली पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले की, वीज निर्मिती क्षेत्रात होत असलेले सातत्यपूर्ण बदल, स्पर्धात्मक वातावरण, नियामक सुधारणा आणि तंत्रज्ञानातील प्रगती लक्षात घेता वीज उद्योगातील सर्वोत्तम पद्धती (Industry Best Practices) अंगीकारणे गरजेचे आहे. यामध्ये वीज केंद्रांचे नियोजनबद्ध संचलन, गुणवत्तापूर्ण देखभाल, डेटा-आधारित निर्णय प्रक्रिया, यांचा समावेश असावा. तसेच प्रशिक्षण, कौशल्यविकास, नियामक जाणीव, वित्तीय शिस्त आणि कार्यक्षमता वाढ या माध्यमातून महानिर्मितीला दीर्घकालीन सक्षम, स्पर्धात्मक आणि आर्थिकदृष्ट्या सुदृढ संस्था म्हणून पुढे नेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
मा. श्री संजय मारुडकर यांनी संचांची उपलब्धता वाढविणे, सहाय्यकारी यंत्रणांची कार्यक्षमता व विश्वसनीयता वृद्धिंगत करणे यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न आवश्यक असल्याचे नमूद केले. संसाधनांचा सुयोग्य वापर करून किफायतशीर दरात शाश्वत वीज निर्मिती करणे हे सर्वांचे सामायिक उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सतत सुधारणा ही केवळ धोरणात्मक संकल्पना न राहता ती महानिर्मितीच्या दैनंदिन कार्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग बनली पाहिजे, असे त्यांनी अधोरेखित केले
मा. श्री अभय हरणे यांनी भविष्यातील स्पर्धात्मक परिस्थिती लक्षात घेता योग्य इंधन व्यवस्थापनाचे महत्त्व अधोरेखित केले. नूतनीकरणक्षम ऊर्जेचा वाढता वाटा विचारात घेऊन दीर्घकालीन नियोजनाद्वारे औष्णिक विद्युत केंद्रांतून महत्तम वीज निर्मिती साध्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. प्रत्येक वीज केंद्राने आपापल्या कार्यक्षेत्रात जबाबदारीची जाणीव ठेवून, संस्थात्मक उद्दिष्टांशी सुसंगत कार्य करावे आणि MOD Framework अंतर्गत विश्वासार्ह व शाश्वत वीज निर्मिती हेच आपले ध्येय असावे, असेही नमूद केले.
मा. श्री. राजेश पाटील यांनी कार्यशाळेची उपयुक्तता स्पष्ट करत कार्यशाळेनंतर प्रत्येक वीज केंद्रात आढावा बैठक घेऊन ही माहिती अधिकारी व कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवावी, तसेच तांत्रिक कौशल्याबाबत जागरूकता निर्माण करून महानिर्मितीच्या सर्वांगीण प्रगतीसाठी प्रयत्नशील राहावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
या सत्राचा विषयपर परिचय व आढावा श्री. प्रसन्ना कोटेचा, मुख्य अभियंता (RCD) यांनी करून दिला. तर कार्यशाळेतील सत्राचे सविस्तर मार्गदर्शन श्री. सुदेश भडांगे, निवृत्त उपमुख्य अभियंता यांनी केले. कार्यशाळेदरम्यान दोन्ही वक्त्यांनी वीज निर्मिती क्षेत्रातील नियामक चौकट, दरनिर्धारण प्रक्रिया हे क्लिष्ट विषय अत्यंत सोप्या व संवादात्मक पद्धतीने मांडत प्रश्नांचे समाधानकारक निराकरण केले.
या कार्यशाळेस महानिर्मितीच्या सर्व औष्णिक वीज केंद्रांचे मुख्य अभियंते, उप मुख्य अभियंते व वित्त विभागाचे महाव्यवस्थापक, उपस्थित होते.
कोराडी प्रशिक्षण केंद्राचे मुख्य अभियंता श्री. शाम राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सौ. भारती विजयकर,अधीक्षक अभियंता तसेच कोराडी प्रशिक्षण केंद्रातील संपूर्ण चमूने या एक दिवसीय कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतले.